Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Seminar & Program
केशायुर्वेद तर्फे इनोव्हेटिव्ह आयुर्वेदावर परिसंवाद

pune  January 28,2018

  

केशायुर्वेद तर्फे इनोव्हेटिव्ह आयुर्वेदावर परिसंवाद Details:  

पुणे : "शास्त्रोक्त उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदात मोठी क्षमता आहे. मूळव्याध, कर्करोग, वातीचे आजार अशा दुखण्यांवर चार-पाच पिढ्या घरगुती उपचार करणाऱ्या जवळपास तीन लाख लोकांना भेटलो आहे. त्यातील अनेकांच्या उपचाराच्या पद्धती आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. आपल्याकडे आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन झाले, आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होईल. चांगल्या कल्पना घेऊन येणाऱ्या आयुर्वेदाचार्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहू," असे प्रतिपादन भारत विकास ग्रुप इंडियाचे (बीव्हीजी) अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले.

वैद्य हरिश पाटणकर यांच्या संकल्पनेतून बीव्हीजी इंडियाच्या सहकार्याने साकारलेल्या ‘केशार्युवेद’ या भारतातील पहिल्या आयुर्वेदिय हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्रातर्फे ‘इनोव्हेटिव्ह आयुर्वेद’वर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील सुमंत मूळगावकर सभागृहात झालेल्या परिसंवादावेळी बीव्हीजी इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड, लायन्स क्लबचे श्रीराम भालेराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नेत्रचिकित्सक डॉ. स्नेहल पाटणकर यांचे ‘आयुर्वेदिय केश परिक्षण पद्धती व महत्त्व’ या विषयावर बीजभाषण झाले, तर वैद्य हरिश पाटणकर यांनी ‘केश व त्वचा विकारांवरील आयुर्वेदिय चिकित्सा’ या विषयावर मार्गदर्शन केले. आयुर्वेदात इनोव्हेशन करु इच्छिणार्‍यांसाठी ‘इन्व्हेस्टर्स-इनोव्हेटर्स मीट’चेही यावेळी आयोजन केले होते.

हणमंतराव गायकवाड म्हणाले, "शास्त्रांमध्ये समृद्ध असलेले आयुर्वेद संशोधनाच्या माध्यमातून लोकाभिमुख केले पाहिजे. लोकांच्या आरोग्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी नवनवीन कल्पना राबवून आयुर्वेद स्वस्त आणि परिणामकारक केले पाहिजे. यामध्ये इनोव्हेशन आणि इन्व्हेंशन करू इच्छिणाऱ्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. बीव्हीजी अनेक आयुर्वेदिक उत्पादनांसाठी प्रयत्नशील आहे. नवीन तंत्रज्ञान आणि पारंपरिक शास्त्र याच्या मिलाफातूनच 'इनोव्हेटिव्ह आयुर्वेद' उदयाला येणार आहे."

डॉ. स्नेहल पाटणकर म्हणाल्या, "केसांच्या आजार निदानासाठी आधुनिक तंत्राचा वापर होत आहे. आयुर्वेदीय पद्धतीच्या उपचाराने केसांवर चांगला परिणाम होतो. केशायुर्वेदच्या माध्यमातून केसांचे आरोग्य कसे सांभाळता येईल, यावर नियमित संशोधन सुरु आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे केसांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही."

वैद्य हरीश पाटणकर म्हणाले, "आयुर्वेद हे खूप व्यापक आरोग्यशास्त्र आहे. पाच हजार वर्षांची परंपरा असलेले आयुर्वेद जगाला आकर्षित करीत आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना समजेल अशा स्वरूपात आयुर्वेदाची मांडणी केली पाहिजे. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन व्हायला हवे."

यावेळी 'केशायुर्वेद'च्या उपकेंद्र प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच 'आयुर्वेद इन कॉस्मेटोलॉजी अँड ट्रायकोलॉजी' हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
डॉ. विवेक आंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर श्री पंकज पाटणकर यांनी टीम मैनेजमैंट या विषयावर व्याख्यान घेतले.
डॉ. दत्ताजी गायकवाड यांच्या हस्ते केशायुर्वेद च्या संशोधनातुन निर्मित वेलवेक्स जेल, ऑईल, सोप, शँम्पु ई. उत्पादनांचे उद्घाटन झाले. लवकरच हि सर्व उत्पादने केशायुर्वेद च्या जगभरातील 90 शाखांमध्ये आपल्या सेवेसाठी उपलब्ध होतील अशी माहीती डॉ. हरिश पाटणकर यांनी दिली