Keshayurvedआयुर्वेदाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण झाले, तर लोक आयुर्वेदाकडे वळतील,

  आयुर्वेदाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण झाले, तर लोक आयुर्वेदाकडे वळतील, ( Keshayurved Hair & Skin care Pvt.Ltd. )
  Posted On July 21,2019              

  संशोधनाने आयुर्वेदावरील लोकांचा विश्वास वाढेल
  डॉ. आशुतोष गुप्ता यांचे प्रतिपादन; केशायुर्वेद १०८ संकल्पपूर्ती व केशायुर्वेद पुरस्कारांचे वितरण

  पुणे : "आयुर्वेद शास्त्राबद्दल लोकांच्या मनात विश्वास आणि अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यांनी यामध्ये संशोधन करण्यावर भर द्यावा. संशोधन ठरवून होत नाही, तर ते मानसिकतेत असावे लागते. आयुर्वेदाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण झाले, तर लोक आयुर्वेदाकडे वळतील," असे प्रतिपादन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी केले.
  भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सोहळा, केशायुर्वेद गौरवग्रंथ प्रकाशन व केशायुर्वेद पुरस्कार वितरण करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या सोहळ्यावेळी उद्योजक प्रतापराव पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश डुंबरे, केशायुर्वेदचे संस्थापक डॉ. हरीश पाटणकर, नानासाहेब पाटणकर आदी उपस्थित होते.

  केशायुर्वेदमध्ये उल्लखेनीय कार्य करणाऱ्या  वैद्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यामध्ये वैद्य कुशाग्र बेंडाळे यांना केशायुर्वेद गौरव, वैद्य रश्मी वेद यांना केशायुर्वेद भूषण, वैद्य ओमप्रसाद जगताप यांना केशायुर्वेद रत्न, तर वैद्य आनंद कुलकर्णी, वैद्य मिलिंद मोरे व वैद्य सुनील पंजाबी, वैद्य बकुळ परदेशी, वैद्य नलीमा रस्तोगी, वैद्य सुप्रिया सातपुते यांना केशायुर्वेद मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्य गायत्री पांडव सर्वाधिक सॅम्पल्सच्या मानकरी ठरल्या. यशश्री वाईकर आणि अरुणकुमार कोळसे यांना तंत्रसाहाय्यासाठी गौरविण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त वैद्य श्रीप्रसाद बावडेकर, वैद्य वैभव मेहता, वैद्य अभिजीत सराफ, वैद्य रसिक पावसकर यांना आचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जीवराज चोले संपादित केशायुर्वेद गौरवग्रंथाचेही प्रकाशन झाले. यामध्ये तीस आयुर्वेदाचार्यांचा, तसेच केशायुर्वेदाचा  प्रवास उलगडण्यात आला आहे.

  डॉ. आशुतोष गुप्तता म्हणाले, "आयुर्वेदाचा प्रचार प्रसार केला, तर या क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. आयुर्वेदामध्ये संशोधन करण्यासाठी कौन्सिलकडून प्रोत्साहन दिले जात असून, त्यासाठी विविध प्रकारचे फेलोशिप प्रोग्रॅम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. शिक्षणविषयक कायदे, यूजीसीचे नियम यांचा अभ्यास करून हे अभ्यासक्रम सुरु केले जातील. केशायुर्वेद ही एक आयुर्वेदातील सुपरस्पेशालिटी असून, याप्रमाणे इतर आजार आणि उपचार पद्धतीची सुपरस्पेशालिटी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. केशायुर्वेदाचा प्रवास केवळ १०८ वर न थांबता तो १००८ वर जायला हवा."


  प्रतापराव पवार म्हणाले, "बाहेरच्या देशांमध्ये फिरताना तिकडे आयुर्वेदाला मोठ्या संधी असल्याचे जाणवते. आयुर्वेदिक औषधांच्या निर्यातीसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. कोणत्याही आजाराच्या मुळाशी जाणे अतिशय महत्वाचे असते. आज ऍलोपॅथीवर लोकांचा अधिक विश्वास आहे. त्याचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे आयुर्वेदाने या संधीचा लाभ उठवून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला पाहिजे. आजारी पडल्यावर डॉक्टरऐवजी वैद्याची आठवण येईल, तो दिवस आयुर्वेदाचा असेल. इतर शास्त्राच्या तुलनेत प्राचीन असलेले आयुर्वेद कोठेही कमी नाही. आयुर्वेदाच्या अभ्यासात बाबतीत चिकित्सक वृत्ती असू द्या. आयुर्वेद अभ्यासाला संशोधन आणि शास्त्रीय दृष्टीने मांडणीची गरज आहे. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. यामधील शास्त्रीय संशोधनाचा खूप लोकांना फायदा होईल. सरकारी पातळीवरही आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न केले जात आहेत, ही सकारात्मक बाब आहे."

  डॉ. अरुण जामकर म्हणाले, "तीन वर्षात केशायुर्वेदच्या १०८ शाखा काढणे हा पराक्रम आहे. कोणतेही नवीन शास्त्र लोकांना शिकवत नाही, तोपर्यंत ते मर्यादित राहते. यावर एक वर्षाचा फेलोशिप प्रोग्राम सुरू करावा. १०८ शाखेत येणाऱ्या रुग्णांचा अभ्यास करा. आयुर्वेदामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर संशोधन व्हायला हवे, त्याशिवाय समाज त्याचा गांभीर्याने स्वीकार करणार नाही."

  डॉ. सतीश डुंबरे म्हणाले, ''केशायुर्वेदचा प्रवास थक्क करणारा आहे. केसासारख्या विषयात काम करत १०८ शाखा चालवणे कौतुकास्पद आहे. या विषयात शैक्षणिक आणि संशोधनाचे काम व्हावे. आयुर्वेद क्षेत्राला समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. केशायुर्वेदाप्रमाणे त्यातील सुपरस्पेशालिटी शोधायला हव्यात."

  डॉ. हरीश पाटणकर म्हणाले, "गेल्या तीन वर्षात केशायुर्वेदच्या देश-विदेशात १०८ सेवा शाखा उभारल्या. यापुढे ही जबाबदारी केशायुर्वेदाच्या सदस्यांवर सोपवत असून, त्यांनी याला पुढे न्यावे. केशायुर्वेद ही एक संशोधन आणि पुराव्यांवर आधारित संकल्पना आपण वाढवत आहोत, याचा अभिमान आहे."

  वैद्य विवेक आंबरे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य हरीश पाटणकर यांनी आभार मानले.